मुख्यपृष्ठ / पाककृती / चकवताची गरगट्ट भाजी

Photo of Chakvatachi Gargatta Bhaji by SUCHITA WADEKAR at BetterButter
2495
2
0.0(0)
0

चकवताची गरगट्ट भाजी

Dec-01-2018
SUCHITA WADEKAR
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चकवताची गरगट्ट भाजी कृती बद्दल

माझं माहेर सातारा जिल्यातील वाई तालुक्यातील ओझर्डे हे गांव. त्या काळी पाच हजार लोकवस्तीचे असेल... तेथील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा होता. त्यामुळे सर्वांचा दिवस लवकर उगवायचा. सकाळी अकरा वाजले की गावात शुकशुकाट पसरत असे ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत. पाच नंतर मात्र पुन्हा लगभग सुरु व्हायची ते रात्री आठवाजे पर्यंत. रात्री आठ नंतर पुन्हा सगळीकडे सामसूम व्हायची. माझ्या माहेरी रोज ताजी भाजी मिळायची. रोज संध्याकाळी मंडई भरायची, 4 वाजले की गावातील शेतकरी शेतातील ताजी भाजी घेऊन विकायला यायचे. त्यामुळे सर्व पालेभाज्या, फळभाजा ताज्या मिळायच्या. वांगी, गवार, दोडके, मेथी, शेपू, चाकवत, कोथिंबीर, पोकळा, लालमाठ अगदी फ्रेश असायचे. त्यामुळे गावातील लोकांना त्यावेळी फ्रीज ची कधी आवश्यकता भासलीच नाही. चाकवत, पोकळा, लालमाठ या पालेभाज्या माझ्या विशेष आवडीच्या. मला आवडतात म्हणून माझी आजी चकवत, पोकळा, लालमाठ अगदी आठवणीने आणायची आणि ती बनवायची देखील मस्त! अशीच आजीची रेसिपी "चकवताची गरगट्ट भाजी" आज तुमच्यासाठी घेऊन आलेय आणि सोबत एक मस्त मजेशीर लेख! लेख थोडा मोठा आहे, पण हा लेख वाचलात की तुमच्या आवडीची पालेभाजी तुम्हाला नक्कीच खावीशी वाटेल याची खात्री आहे. मध्यन्तरी मौनसंवादामुळे या भाज्यांचे अंतरंग मला समजले भाज्यांचे अंतरंग ! मौनसंवाद ... प्रथम मौन संवाद म्हणजे काय? हे जाणून घेऊ. मौन म्हणजे काहीच न बोलणे आणि संवाद म्हणजे बोलणे. थोडक्यात काही न बोलता संवाद साधणे. पण हा मौनातील संवाद साधायचा कसा? खरे तर संवादामुळे नाते छान खुलते... आई-वडील, आजी-आजोबा, मित्र-मैत्रिणी, शिक्षक, शेजारी, नातेवाईक यांच्या सारख्या अनेकांशी आपण प्रत्यक्ष बोलतो म्हणून संवाद साधणे शक्य होते. मात्र हा मौनात राहून संवाद साधायचा कोणाशी आणि कसा ?... हा संवाद साधायचा तो असंख्य वस्तूंशी ... जसे की आपलं कपाट, शाळा, पेन, सायकल, एखाद झाड किंवा एखादे पुस्तक यांच्याबरोबर. या वस्तू आपल्याशी बोलतात असं समजायचं अन संवाद सुरु करायचा आणि ते संवाद लिहून काढायचे. आपल्याच मनाने कल्पना करून स्वतःशीच केलेला संवाद म्हणजे मौन संवाद होय. कल्पना खूप मजेशीर आहे. हळूहळू आपण त्या वस्तूच्या जागी जाऊन विचार करायला लागतो, आतापर्यंत विचार न केलेल्या गोष्टी सुचू लागतात. आपण त्यावस्तूंची नीट काळजी घेऊ लागतो त्याचबरोबर दुसऱ्यांचाही विचार करणारे एक संवेदनशील मन घडू लागते. बघा प्रयत्न करून. तुमची मुले लहान असतील तर मुलांनाही शिकवा आणि गंमत बघा. मुले देखील त्यांच्या वस्तू नीट हाताळायला लागतील ... मी देखील असाच प्रयत्न केला आणि भाज्यांचे अंतरंग मला कळले. बुधवार आठवडी बाजाराचा दिवस. याबाजरात कमीतकमी तीन तरी पालेभाज्या घेणं होतं, त्यात कोथिंबीर ही ठरलेलीच असते सोबत कधी पालक, शेपू, मेथी तर कधीतरी चवळईची वर्णी लागते. पोकळा इकडे मिळत नाही. बऱ्याच दिवसात लाल माठ आणि चाकवत घेतलाच गेला नव्हता. बऱ्याचदा चाकवत नसतोच, परवा मात्र कोथींबीरिसोबत लाल माठ आणि चाकवत ही घेऊन घरी आले. त्या निवडण्यासाठी त्यांना पेपरवर काढून ठेवले आणि इतर कामासाठी मी स्वयंपाकघरात गेले. थोड्यावेळाने मला अस्पष्ट अशी कुजबुज ऐकू येऊ लागली. घरात तर दुसरे कोणीही नव्हते, मग कोण बोलत असेल म्हणून कानोसा घेऊ लागले तर या दोन भाज्या एकमेकींशी बोलत होत्या. आता मात्र माझे माझे कान टवकारले आणि मी त्यांचे बोलणे लक्ष देऊन ऐकू लागले... लाल माठ : "आज मला किती आनंद झालाय म्हणून सांगू .. अगदी आनंदाने नाचावेसे वाटतेय". चाकवत : "हो गं, अगदी खरंय तुझं". लाल माठ : "खूप खूप वर्षांनी आज हिने मला घरी आणलंय, हिच्या लहानपणी हिला मी खूप आवडायचे. बरीचशी मुलं मला बघितलं कि नाकं मुरडतात पण हिने माझ्यावर प्रेमच केलं नेहमी". चाकवत : "हो गं, अगदी खरंय तुझं, माझ्यावरही खूप प्रेम करायची". लाल माठ : "हिला आपण आवडतो म्हणून हिची आजी अगदी आठवणीने आपल्याला घरी न्यायची". चाकवत : "हो आणि आपल्याला बघितल्यावर तर हि नचूच लागायची". लाल माठ : "मात्र हिचं लग्न झालं अन हि विसरलीच आपल्याला". चाकवत : "हो खरंय तुझं. मागे काही वर्षांपूर्वी एक दोनदा आणलं होतं हिने मला घरी, तेवढंच काय ते... ". लाल माठ : "बऱ्याचदा बाजारात दिसायची तेव्हा मी खूप आनंदून जायचे. ती जवळ यायची तेव्हा पटकन तिच्या पिशवीत उडी मारून बसवेसे वाटे, पण हिचं माझ्याकडे लक्षच नसायचं. खूप वाईट वाटायचं तेव्हा". चाकवत : "हो आणि कोथिंबीर, पालक, मेथी, शेपू ह्या तिच्या ठरलेल्या भाज्या घेऊन निघून जायची". लाल माठ : "कित्येकदा मला हातात घ्यायची अन परत ठेऊन द्यायची आणि नेहमीच्या भाज्या घेऊन घरी जायची. एवढा हेवा वाटायचा म्हणून सांगू त्या कोथिंबीर, पालक, मेथीचा... काही विचारू नको". चाकवत : "हो गं, मलापण". हे सगळं मी कान देऊन ऐकत होते. मी अवाकच झाले. भाज्याही असा विचार करतात तर! मला खूप गिल्टी वाटू लागलं. हळूच मी हॉलमध्ये गेले, माझी चाहूल लागताच दोघीही एकदम चुपचाप झाल्या. पुन्हा मी किचन मध्ये आले तर दोघींची कुजबुज पुन्हा सुरु झाली. मग आतूनच आवाज दिला... मी : "आले गं मी पण, माझ्याविषयीच बोलताय ना! आपण तिघी मिळून गप्पा मारू". असे म्हणत मी हॉल मध्ये गेले आणि प्रेमाने दोघींवरून हात फिरवला. त्या दोघींनाही खूप भरून आलं. मी त्यांना उचलून हातात घेतले आणि म्हणाले... मी : "चुकलंच माझं, बरेच वर्ष झाले मी तुमच्याकडे पाहिलं देखील नाही, परंतु आज माझी चूक तुम्ही माझ्या लक्षात आणून दिलीत. Thanks! इथून पुढे मी नक्की काळजी घेईन, निदान महिन्यातून एकदा तरी तुम्हाला नक्की घरी घेऊन येईन". हे ऐकून त्या दोघींच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सौ. सुचिता मिलिंद वाडेकर पुणे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ● चकवताची एक गड्डी
  2. ● पाव वाटी शेंगदाणे
  3. ● 4 हिरव्या मिरच्या
  4. ● 5 लसूण पाकळ्या
  5. ● अर्धा चमचा जिरे
  6. ● आवश्यकतेनुसार मीठ
  7. ● 2 चमचे बेसनपीठ
  8. ● तेल 3 ते 4 चमचे

सूचना

  1. प्रथम भाजी निवडून स्वच्छ धुऊन घ्यावी.
  2. नंतर कुकरमध्ये धुतलेली भाजी आणि शेंगदाणे घालून 2 शिट्ट्या घ्याव्यात व गॅस बंद करावा.
  3. मिरची, लसूण आणि जिरेचे वाटण करावे.
  4. भाजी शिजल्यानंतर त्यात बेसनपीठ घालावे व मिक्सरला अथवा ब्लेंडरने थोडी हटून घ्यावी. माझी आजी रवीने हटायची.
  5. गॅसवर एका पॅन अथवा कढई मध्ये तेल टाकून बारीक केलेले मिरचीचे वाटण घालावे व थोडे परतावे.
  6. नंतर यात हटलेली भाजी घालावी आणि मीठ घालून पाच मिनिटे झाकण ठेवून वाफ द्यावी.
  7. पाच मिनिटांनी झाकण उघडून एकदा हलवावे आणि गॅस बंद करावा.
  8. आपली चकवताची गरगट्ट भाजी तैयार !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर